मुंबई,दि. : Fraud: अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शासकीय योजनेतून सौर कृषीपंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अहमदनगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
वीजग्राहकांनी अशा प्रकारच्या बनावट संकेतस्थळाला प्रतिसाद देऊ नये. सौरकृषी पंप योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाला वा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने jalsanjivini.in या बनावट वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र योजनेची संपूर्ण माहिती वा लाभ घेण्यासाठी अधिकृत शासकीय संकेतस्थळावर वा कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महावितरणच्या अधिकृत http://www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महावितरण नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.