सोलापूर,दि.१९: मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे शेतातून गुप्तधन (Guptadhan) काढून देण्याचा बहाणा करुन ६१ लाख ७० हजार रुपये घेऊन त्याच्या बदल्यात सोन्याच्या रंगाच्या नकली व पितळी आणि इतर धातूंची नाणी, दागिने देऊन फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमद खादरसाहब शेख, रेवप्पा विठोबा येड्डे, सन्त्रप्पा विठोबा येड्डे , विठ्ठल रेवप्पा रेड्डे ( सर्व रा. हुलजंती ) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
फिर्यादी लक्ष्मण रामचंद्र माने ( वय ३४, रा. सलगर खु. ) व त्यांच्या वडिलांचे मेहुणे सोपान तुकाराम पुजारी, नवनाथ तानाजी मेटकरी यांना आरोपींनी शेतातून गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवले. ही घटना १३ जुलै रोजी सायंकाळ सहा वाजल्यापासून ते १४ जानेवारी रात्री आठ या कालावधीत घडली आहे.
शेतातील सदर ठिकाणी पूजा, अंगारे, धूप जाळून राख उधळून त्यांच्याकडून वेळोवेळी रकमा घेतल्या. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवितास धोका होईल याची भीती घालून ६१ लाख ७० हजार रुपये घेऊन त्याच्या बदल्यात सोन्याच्या रंगाचे नकली, पितळी व इतर धातूचे दागिने देऊन वरील आरोपींनी फसवणूक केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.








