Fraud Case: शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक दोघांना अटक

0

बार्शी, दि.१६: नागरिकांची ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी (Barshi Fraud Case) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींना शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींना अटक करून बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिले. बार्शीत गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावणारा मुख्य आरोपी विशाल फटे याच्यासह त्याची पत्नी, आई, वडील व भाऊ अशा पाचजणांविरुध्द बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बार्शी शहर व परिसरातील अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्ष फिर्याद देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. अखेर दीपक अंबारे यांनी फिर्याद दिल्यानंतर विशाल फटे, राधिका फटे, अंबादास फटे, वैभव फटे, अलका फटे यांच्याविरुध्द पाच कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याने पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी गतीने तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उशिरा अंबादास फटे व वैभव फटे यांना सांगोल्यातून अटक केली व शनिवारी मध्यरात्री बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिले.

शनिवारी या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी दोघांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यामध्ये फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

प्राध्यापकाचा मुलगा निघाला उद्योगी
विशाल फटे हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील संस्थेत प्राध्यापक होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून तो बार्शीतच वास्तव्यास होता. बार्शीतच तो साई नेट कॅफे चालवत होता. सुरुवातीला तो छोट्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करत होता. २०१९ साली फिर्यादी दीपक आंबरे हे विशाल याच्या नेट कॅफेमध्ये पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी गेले होते. तेथे त्यांची विशालसोबत ओळख झाली. 
विशालने दीपकला शेअर बाजाराबद्दल सांगितले आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा ७० हजार रुपये घेतले. पहिल्याच महिन्यात ३० हजार रुपये वाढ करून एक लाख रुपयांचा परतावा विशालने दीपकला दिला. यामुळे त्यांचा विश्वास वाढत गेला. 
दीपक यांनी स्वत:सह आपल्या परिवारातील सदस्य, नातलगांचे पैसे, अशी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक विशालकडे केली. बार्शीतील अनेकांनी विशालकडे पैसे गुंतवलेले होते. 

नफा झाल्याची खोटी माहिती द्यायचा
ॲल्गो ट्रेडिंगच्या नावाखाली  ॲटो ट्रेड करून मोठ्या प्रमाणात रिटर्न देतो, असे बोलायचा.   त्याच्या विशालका या वेबसाइटचे एक ॲप त्याने तयार केले होते. तो त्यासंबंधित टिप्स ग्राहकांना द्यायचा, कृत्रिमरीत्या या ॲपवर ट्रेड केलेल्या एंट्री तयार करायचा व आज एवढा प्रॉफिट झाला, असे दाखवून त्यांना पैसेही देत होता. वास्तवात मात्र अशा प्रकारे तो कुठलेच ट्रेडिंग करीत नव्हता, हे आता स्पष्ट झाले आहे.

कोण आहे विशाल फटे?
गेल्या १० ते १५ वर्षांपासून आपण शेअर बाजारात ट्रेडिंग करत असल्याचे तो लोकांना सांगायचा. 
अलका शेअर सर्व्हिसेसचे संस्थापक, विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संचालक, फोग्स ट्रेडिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, NSE, BSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here