जौनपूर,दि.5: उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार धनंजय सिंह (Dhananjay Singh) यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. अपहरण आणि खंडणी प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. आता जौनपूर न्यायालय उद्या बुधवारी शिक्षेची घोषणा करणार आहे. सध्या आरोपी धनंजय सिंहला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. खरेतर, जौनपूरचे माजी खासदार आणि जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस धनंजय सिंह यांना जौनपूरच्या MP-MLA (खासदार-आमदार) न्यायालयाने नमामी गंगेच्या अभियंत्याकडून खंडणी आणि अपहरण प्रकरणी दोषी ठरवले आहे. हे प्रकरण २०२० सालचे आहे.
10 मे 2020 रोजी मुझफ्फरनगर येथील रहिवासी नमामी गंगेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी धनंजय सिंह आणि त्यांचा साथीदार विक्रम यांच्या विरोधात अपहरण, खंडणी आणि इतर कलमांखाली लाईन बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात त्यांनी सांगितले होते की, विक्रमने दोन साथीदारांसह सिंघलचे अपहरण केले आणि माजी खासदाराच्या घरी नेले.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, धनंजय सिंह पिस्तूल घेऊन तेथे आले आणि त्यांनी शिवीगाळ केली आणि कमी दर्जाचे साहित्य पुरवण्यासाठी दबाव टाकला. नकार दिल्याने त्यांनी धमकावून खंडणी मागितली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून माजी खासदाराला अटक केली. मात्र, नंतर त्यांना कोर्टातून जामीन मिळाला.
निवडणूक लढवण्याच्या तयारीत
धनंजय सिंह आगामी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या एका पोस्टद्वारे याची पुष्टी केली. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर धनंजय सिंह यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. कारण, भाजपने जौनपूर लोकसभा मतदारसंघातून कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर धनंजय सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्वतःचे एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले, “मित्रांनो! तयार राहा… लक्ष्य फक्त एक लोकसभा 73, जौनपूर आहे. यासोबतच त्यांनी ‘जीतेगा जौनपूर-‘सोबतचा त्यांचा फोटोही शेअर केला आहे. जीतेंगे हम’ धनंजय सिंह स्वतंत्र मैदानात उतरणार की नितीश कुमार यांच्या पक्ष जेडीयूच्या चिन्हावर हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या पोस्टद्वारे धनंजय यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.