अलिबाग,दि.१४: माजी आमदार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. माजी आमदार अवधूत तटकरे हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. सुनील तटकरेंसोबत झालेल्या वादानंतर अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. २०१४ मध्ये अवधूत तटकरे हे श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या जागेवर शिवसेनेने अवधूत तटकरेंना उमेदवारी न देता विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यापासून अवधूत तटकरे पक्षात काहीसे बाजूला गेले होते. शिवसेनेत अवधूत तटकरेंना फारसा प्रभाव पाडता आला नाही. मधल्या काळात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आल्याने अवधूत तटकरे सक्रीय नव्हते. त्यामुळे शिवसेनेत राजकीय भवितव्य नाही हे ओळखून त्यांनी भाजपाशी जवळीक साधली. आता अवधूत तटकरे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद झाल्याने अवधूत तटकरेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून कन्या आदिती तटकरेंना उभे करणार असल्याचं समोर आले होते. पेण विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबात असेच कलह झाले होते. सुनील तटकरे यांचे थोरले बंधू अनिल तटकरे यांनी काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असतानाही पेणमधून आघाडीच्या विरोधात उमेदवारी केली. या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसून आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी कौटुंबिक वाद असल्याचे चित्र निर्माण करून तटकरेंनी दगा केल्याचा जाहीर आरोप रवींद्र पाटील यांनी केला होता. मात्र २०१९ मध्ये या वादातूनच अवधूत यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली होती. २०१९ ला अवधूत तटकरे, वडील माजी आमदार अनिल तटकरे व भाऊ संदीप तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता.