कोल्हापूर,दि.५: माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी हरियाणातून म्हैस विकत आणली आहे. यापूर्वीही हसन मुश्रीफ यांनी हरियाणातून म्हैस विकत आणली होती. हरियाणातील म्हशी जास्त दूध देतात. याआधी चार महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी पहिली म्हैस विकत घेतली होती. गोकुळ दूध संघाचे संकलन वाढविण्याच्यादृष्टीने नेतेमंडळी, संचालक, कर्मचाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी म्हशी घेण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्याची सुरुवात स्वतःपासूनच केली होती. आता त्यांनी आणखी एक म्हैस खरेदी केली आहे.
जिल्ह्यातून बाहेर जाणारे दूध थांबले पाहिजे
वाढते तापमान आणि लंपी रोगामुळे जागतिक पातळीवर दूध उत्पादनामध्ये १२ टक्के घट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दूध संकलनावरही याचा परिणाम झाला आहे. मुंबईत म्हशीच्या दुधाची २५ लाख लिटर विक्री होऊ शकते. मात्र, गोकुळ दूध संघाचे संकलन १२ लाख लिटरवर आहे. कोणत्याही परिस्थितीत २५ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर जिल्ह्यातच दूध उत्पादन वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातून बाहेर जाणारे दूध थांबले पाहिजे, असेही माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी _ _
गोकुळच्या दूध उत्पादकांची संख्या पाच लाखांवर आहे. त्यापैकी चौथाई म्हणजे सव्वा लाख शेतकऱ्यांनी फक्त एक -एक म्हैस जरी घेतली तरी जिल्ह्याच्या दूध उत्पादनामध्ये दहा ते बारा लाख लिटरने वाढ होऊन २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा सहज गाठू शकतो. चार महिन्यापूर्वी संचालक मंडळाच्या उपस्थितीत आम्ही दूधवाढीसाठी कार्यशाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी संकल्प केला होता की नेत्यांनी व संचालकांनी प्रत्येकी दोन म्हशी घेतल्या पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेतलीच पाहिजे. शेतकऱ्यांनाही एक म्हैस घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी केडीसीसी बँक अर्थसहाय्य करील व गोकुळ दूध संघ जास्तीत -जास्त अनुदान देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, नितीन दिंडे व सतीश घाटगे आदी उपस्थित होते.
हसन मुश्रीफांची अमूलला टक्कर देण्यासाठी योजना
काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांनी दुग्धउत्पादनासंदर्भात भाष्य करताना मुंबई आणि पुण्यात २० लाख लीटर म्हशीच्या दुधाची बाजारपेठ उपलब्ध असल्याचे म्हटले होते. त्यादृष्टीने गोकुळकडून आगामी काळात ही बाजारपेठ पादाक्रांत करण्याचा प्रयत्न होणार आहे. अमूल दूध संघाने नाशिकमध्ये ८५० एकर जमीन घेतली होती. याठिकाणी अमूलकडून म्हशीच्या दुधाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या माध्यमातून अमूलकडून मुंबई आणि पुण्यातील म्हशीच्या दुधाची बाजारपेठ ताब्यात घेण्याचा डाव असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्याला शह देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी गोकूळच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आम्ही अमूलइतका मोठा प्रकल्प उभारू शकत नाही. पण दूध उत्पादन वाढवून या स्पर्धेत काही प्रमाणात टिकून राहता येईल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.