माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

0

मुंबई,दि.२: ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दीर्घ चौकशी केल्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना अटक केली. त्यानंतर आज सकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. अनिल देशमुख यांना आज मुंबई सत्र न्यायालयाच्या सुट्टीकालीन विशेष कोर्टाने जामीन नाकारत ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. हा अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे मानला जात आहे. देशमुख यांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांना जोरदार बाजू मांडली असतानाही अखेर कोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. यामुळे अनिल देशमुख याची दिवाळी आता कोठडीतच जाणार आहे.

सुप्रीम कोर्टातही अनिल देशमुख हे केवळ संशयित असल्याचे पूर्वीपासून म्हटले होते. २९ ऑक्टोबरच्या हायकोर्टातील सुनावणीतही तसेच म्हटले होते. त्यानुसार ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. मग तीन दिवसांत ईडीला असे काय पुरावे मिळाले की त्यांना अटक करणे आवश्यक वाटले. देशमुख यांची प्रकृती ठीक नाही, त्यांना अनेक आजार आहेत. त्यामुळे ईडी कोठडी देण्यात येऊ नये”, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी मांडला. मात्र, कोर्टाने हा युक्तीवाद मान्य केला नाही.

अनिल देशमुख यांची ईडीने काल सोमवारी तब्बल १३ तास चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा देशमुख यांना अटक केली. देशमुख यांना ईडीने पाच वेळा समन्स बजावले होते. मात्र ते ईडीसमोर आले नव्हते. अनेक दिवसांनंतर ते प्रथमच काल सोमवारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्या वेळी त्यांच्या सोबत त्यांचे वकीलही होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here