दि.27: Digvijay Singh: 2011 मध्ये उज्जैन येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी इंदूरच्या विशेष न्यायालयाने आज माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Former CM Digvijay Singh), माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्यासह 6 आरोपींना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. उज्जैन येथे ही घटना घडली होती. इंदूर येथील विशेष न्यायालयाने या खटल्यात 11 वर्षांनंतर शनिवारी निकाल दिला.
2011 मध्ये काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला जात असताना माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उज्जैनचे तत्कालीन खासदार प्रेमचंद गुड्डू आणि इतर सात जणांचा भाजप कार्यकर्त्यांशी वाद झाला होता. या प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह, प्रेमचंद गुड्डू यांच्यासह 9 आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
उज्जैन येथे 17 जुलै 2011 रोजी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते. दिग्विजय सिंह यांचा ताफा जात असताना तीव्र निदर्शने करण्यात आली होती. दिग्विजय यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने केली गेली होती. यावेळी दिग्विजय सिंह आणि माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्या समक्षच काँग्रेस आणि भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये वाद भडकला होता. त्या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन भाजयुमो कार्यकर्ता रितेश खाबिया याला बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी लोकप्रतिधींवरील दाव्यांसाठीच्या इंदूर येथील विशेष न्यायालयात खटला चालला व शनिवारी (दि.26) न्यायालयाने निकाल सुनावला.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, माजी खासदार प्रेमचंद गुड्डू यांच्यासह सहा आरोपींना इंदूरमध्ये लोकप्रतिनिधींच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी शिक्षा सुनावली, तर तीन आरोपींना पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. माजी सीएम दिग्विजय सिंह, प्रेमचंद गुड्डू यांच्यासह सहाही आरोपींना पाच-पाच हजारांचा दंड भरल्यानंतर 25-25 हजारांच्या जामीनावर कोर्टात जामीन मंजूर करण्यात आला.
शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार
सरकारी वकील विमल कुमार मिश्रा यांनी सांगितले की, सर्व आरोपींची शिक्षा 3 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे, दिग्विजय सिंह यांच्या वकिलाने सांगितले की, या प्रकरणी ते उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. माजी खासदार प्रेमचंद गुड्डू म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयावर मी भाष्य करू इच्छित नाही, परंतु उच्च न्यायालयात या शिक्षेविरुद्ध अपील करणार आहोत. त्याचवेळी प्रेमचंद गुड्डू यांनी असेही सांगितले की, या घटनेच्या वेळी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना झेड प्लस सुरक्षा होती. या सुरक्षेमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचे म्हणणे न्यायालयात घेण्यात आले नाही.