बंगळूरू,दि.15: सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (81) यांच्यावर एका मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 (पोक्सो) च्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
येडीयुराप्पा यांच्याकडे फसवणुकीच्या एका प्रकरणात एक महिला आणि तिची 17 वर्षांची मुलगी मदत मागण्यासाठी आली होती. यावेळी येडीयुराप्पा यांनी या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. 2 फेब्रुवारीचा हा प्रकार असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
POCSO कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या सोबत असलेल्या आईने गुरुवारी संध्याकाळी पोलिसात तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली.
बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या महिलेने आजपर्यंत दाखल केलेल्या 53 प्रकरणांची यादी जारी केली आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने तक्रारदार महिलेला अशा तक्रारी दाखल करण्याची सवय असल्याकडे लक्ष वेधले आहे.