मुंबई,दि.15: राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. नवाब मलिक यांनी भाजपवर अमरावतीत दंगल भडकवल्याचा आरोप केला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनीच दंगलीचा कट रचला होता. दंगल भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले होते. भाजपच्या एका आमदाराने हे पैसे वाटले होते, असा गंभीर आणि खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्रिपुरातील कथित हिंसाचारावरून मालेगाव (malegaon), अमरावतीमध्ये (amravati) बंदला हिंसक वळण मिळाले. या प्रकरणी अटक सत्र सुरू झाले आहे. तर दुसरीकडे, रझा अकादमीवरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रझा अकादमीचा फोटो शेअर करून टीकास्त्र सोडले. आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी भाजपचे (bjp) आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांचा रझा अकादमीच्या (Raza Academy) कार्यालयात असल्याचा फोटो समोर आणून खळबळ उडवून दिली.
भाजपचे आमदार आशिष शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात बसून बैठक करतायत, त्याचे फोटो आहेत. त्यांचा संबंध आहेत असं आपण म्हणू शकत नाही. रझा अकदमीच्या कार्यालयात बसून आशिष शेलार बैठक कशासाठी करत होते याचं उत्तर त्यांनीच द्यावं, असा थेट सवाल मलिक यांनी विचारला आहे. तसंच, दंगे करण्या एवढी रझा अकदमीची ताकद नाही, जे दंगेखोर आहेत त्यांना जेलमध्ये टाकले जाईल, असंही मलिक म्हणाले.
मागील शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काही मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. त्रिपुरा प्रकरणी बंद केला होता अशी माहिती मिळतेय. नांदेड, मालेगाव, अमरावती या शहरात बंद करण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी ज्यांनी दगडफेक केली होती त्यांना अटक केली आहे. मालेगावमध्ये एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर देखील एफआयआर दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.
‘मुफ्ती इस्माईल हे एमआयएममध्ये गेलेला नगरसेवक आहे. तो नावाला राष्ट्रवादीमध्ये आहे. शुक्रवारी आणि शनिवारी भाजपच्या वतीने बंद करण्याबाबत घोषणा करण्यात आली यामध्ये सुनियोजित पद्धतीने दंगे भडकावण्यात आले होते. अमरावतीमध्ये कोणत्याही समुदायामध्ये राडा झाला नाही. तर भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नियोजित पद्यतिने दंगल घडवून आणली. पोलीस चौकशीत हा प्रकार समोर आला.आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये एक बाब समोर आली आहे की मुंबईतून मोठ्या प्रमाणात पैसा यासाठी देण्यात आला होता भाजपची पद्धत आहे की ज्यावेळी सगळे पर्याय संपतात त्यावेळी ते दंगल घडवून आणतात, असा आरोप मलिक यांनी केला.
‘अशाप्रकारचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. सरकार उखाडून टाकता येत नाही ती लोकांच्या माध्यमातून मिळत असते. सरकार उखडून टाकण्याचा खेळ महाराष्ट्रमध्ये चालणार नाही. त्यांची अजूनही एक पद्धत आहे की केंद्रीय यंत्रणा वापरून दबाव आणला जातो. बंगालमध्ये देखील हीच बाबसमोर आली आहे. महाराष्ट्र बँक प्रकरणी शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. भाजपने हे लक्षात घ्यायला हवं पैशाने आणि केंद्रीय यंत्रणांच्या भीतीने हे सरकार पडणार नाही. महाराष्ट्र सरकारचे चुंबक हे शिवाजी महाराज यांचे विचार आहे. महाराष्ट्र सरकार दिल्ली समोर कधीही झुकणार नाही. आम्ही त्यांचा सामना करू, असंही मलिक म्हणाले.