सोलापूर,दि.8: सोलापुरातून गोव्याकडे (Solapur-Goa Flight) जाणार विमान अचानक रद्द झाल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला. दोन तासांहून अधिक वेळ विमानाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी साडेचार वाजता गोव्याचे विमान रद्द झाल्याची माहिती मिळताच वेटिंग रूममध्ये बसलेल्या प्रवाशांनी फ्लाय 91 कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात गोंधळ सुरू केला.
विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे देशभरात इंडिगो विमान कंपनीविरोधात प्रवाशांचा रोष वाढत असतानाच रविवारी अशीच स्थिती सोलापूरच्या विमानतळावर पाहायला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 56 प्रवासी सोलापुरातून गोव्याकडे जाणार होते.
दीड वाजलेपासून प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. अनेकांना बोर्डिंग पासही देण्यात आले होते. दुपारी दोन वाजून 55 मिनिटांनी विमान उड्डाण घेणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे गोव्याहून सोलापूरकडे येणारे हे विमानच रद्द झाल्याने पुढील उड्डाणही रद्द करण्यात आले.
साडेचारपर्यंत गोव्याहून विमानाने उड्डाण न केल्याने अखेर वेळापत्रक रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. या प्रवाशांमध्ये सोलापूरसह विजयपूर, लातूर आणि गुलबर्गा येथील प्रवाशांचा समावेश होता. विमान रद्द झाल्याचे कळताच सर्वांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रवाशांची समजूत काढता काढता कर्मचाऱ्यांचे अक्षरशः नाकी नऊ आले. अनेकांनी कंपनीविरोधात तक्रार करून विमानतळ सोडले.








