काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिवांवर अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली,दि.28: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर एका 26 वर्षीय महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पीपी माधवन यांच्याविरुद्ध दिल्लीत बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने उत्तम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार महिलेने 71 वर्षीय पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार माधवन यांनी महिलेविषयी प्रेम व्यक्त करत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांनी संमतीशिवाय या महिलेशी लैंगिक संबंध ठेवले. तक्रारदार महिलेचे पती दिल्लीमधील काँग्रेसच्या कार्यालयात पोस्टर्स लावण्यासोबतच इतर काम करायचे. मात्र त्यांचे 2020 साली निधन झाले होते.

नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने काँग्रेसच्यासोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्यावर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. “माझ्या पतींचा फ्रेब्रुवारी 2020 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मी नोकरीच्या शोधात असताना माझी माधवन यांच्याशी ओळख झाली. त्यांनी अगोदर मला मुलाखतीसाठी बोलावले. ते माझ्याशी व्हिडीओ कॉल तसेच व्हॉट्सॲपवर बोलायचे,” असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.

तसेच, “माधवन मला उत्तम नगर मेट्रो परिसरातील एका निर्जन स्थळी घेऊन गेले. तेथे एका कारमध्ये त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. फेब्रुवारी 2022 साली ते मला सुंदर नगर येथील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. येथेही त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली होती,” असाही दावा तक्रारदार महिलेने केले आहे.

दरम्यान, पीपी माधवन यांच्या स्वीय सहाय्यकाने बलात्काराचे हे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच हे एक कटकारस्थान असून आरोप निराधार आहेत, असेदेखील पीपी माधवन यांच्या स्वीय सहाय्यकाने सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here