अखेर ईडीच्या कार्यालयात माजी गृहमंत्री अनिल देशमुख झाले हजर

0

मुंबई,दि.१: माजी गृहमंत्री अनिल देशमुख अनेक दिवसांपासून भूमिगत राहिल्यानंतर आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. देशमुखांनी सचिन वाझे व अन्य अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट अँड बारकडून १०० कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले, असा आरोप माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह केला होता.

राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात चौकशीस सुरुवात झाली होती. अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देत होते. १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगायचे. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून वसुली करण्यास सांगायचे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलिसांना बंगल्यावर बोलवायचे, असा आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला होता.  

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले आणि गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर आज प्रकट झाले आहेत. हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दिलासा न मिळाल्याने आज अखेर अनिल देशमुख हे आज ईडीसमोर हजर झाले आहेत. अनेक दिवसांपासून भूमिगत राहिल्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. दरम्यान, ईडीकडून चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांत चौकशीला हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स जारी केले होते; पण ते चौकशीसाठी एकदाही हजर झालेले नव्हते. त्याचप्रमाणे सीबीआयने त्यांच्या कार्यालय व  घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात  धाव घेतली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. कारवाईपासून संरक्षण हवे असल्यास ते विशेष न्यायालयात जाऊ शकतात, असे हायकोर्टाने सांगितले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here