Mohit Kamboj: कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई, 1 जून: कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी गुन्हा दाखल केला. कर्ज बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंबोज यांच्या कंपनीनं 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतलं होतं, त्यासाठी त्यांचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, त्यानंतर ते कर्ज बुडवल्याचाही ठपका कंबोज यांच्यावर ठेवण्यात आला होता.

कंबोज यांनी ते कर्ज बुडवले होते. याप्रकरणी कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक व कट रचल्याचा त्यांच्याविरोधात आरोप ठेवण्यात आला आहे. कंबोज यांनी स्वतः ट्वीट करून त्यांच्याविरोधातले आरोप फेटाळले आहेत.

मोहित कंबोज म्हणाले की, “मला कळालं की, मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांच, मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही” असं म्हणत कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here