पुणे,दि.३१: धडाडीच्या आणि डॅशिंग पोलीस अधिकारी शिल्पा चव्हाण (Shilpa Chavan) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी होत्या. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर येथे शिल्पा चव्हाण राहत होत्या. तिथंच त्यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. आज दुपारी ही घटना समोर आली. गुन्हे शाखेत नेमणूक होण्यापूर्वी शिल्पा चव्हाण या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत होत्या. काही महिन्यांआधी त्यांच्याकडे गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
‘शिल्पा चव्हाण या धडाडीच्या आणि डॅशिंग पोलीस अधिकारी होत्या. अशा अधिकाऱ्यानं इतकं टोकाचं पाऊल उचलणं ही घटना खूपच खेदजनक आहे. या घटनेवर विश्वासच बसत नाही,’ अशी प्रतिक्रिया पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.