Fate Scam: फटे फसवणूक प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे वर्ग

0

बार्शी,दि.१७: येथील अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fate Scam) करणारा मुख्य आरोपी विशाल फटे (Vishal Fate) प्रकरणाचा तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण अंतर्गत विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी बार्शीतील गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आकडा १८ कोटी ५३ लाख १७ हजारांवर पोहोचल्याचे समोर आले आहे. आणखी गुंतवणूकदार पोलिसांकडे येत असून हा आकडा आणखी वाढणार आहे.

या फसवणूक प्रकरणासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून याअंतर्गत आणखी पाच पथके तपासासाठी यात कार्यरत असणार असणार आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय बोटे यांच्या नेतृत्वाखालील उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार आणि सोलापूरचे फौजदार मासाळ यांचा या पथकात समावेश आहे.

विशेष पथकांतर्गतच या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले. शेअर्स मार्केटच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या तिसऱ्या दिवशी फसवणुकीचा आकडा आणखी पुढे सरकला असून तो १८ कोटी रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. बार्शीतील विशाल फटेने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीने राज्यभरात खळबळ माजली आहे. बार्शी पोलिसांनी गतीने पावले उचलत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान, प्रकरण राज्यभरात गाजत असल्याने मुख्य आरोपी फटे याला पकडण्यासाठी सर्वत्र पथके रवाना झाली आहेत. या फसवणुकीमधील गुंतवणूकदारांमध्ये बार्शीसह निपाणी, पुणे यासह इतरही जिल्ह्यातील अनेकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेकडो गुंतवणूकदार तब्बल २०० कोटींना डुबले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कित्येक लोकांनी घर, जमीन गहाण ठेवून, सोने बँकेत ठेवून त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. बार्शी व परिसरासोबतच त्याच्याकडे निपाणी (कर्नाटक), पुणे, आटपाडी (सांगली) भागांतीलही अनेकजणांच्या गुंतवणुकी होत्या, अशीदेखील चर्चा आहे. त्याच्या मंगळवेढा तालुक्यातील गावी वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. नुकतेच त्याने गावाकडे एक छोटेसे फार्म हाऊस बांधले होते.

१५ जण होते कामाला

बार्शीत उपळाई रोडवर असलेल्या त्याच्या कार्यालयात दहा ते पंधरा मुली कामाला होत्या. मात्र प्रत्यक्षात त्या कोणते काम करीत होत्या, हेदेखील अद्याप समजलेले नाही. एक महिन्यापूर्वी त्याने या मुलींना कामावरून कमी केले होते.

गुंतवणूकदारांवर छाप टाकायचा

विशाल फटे हा मित्राशी किंवा गुंतवणूकदार यांच्याशी बोलताना माझ्या फॉक्स ट्रेडिंग सोल्युशन या अल्गो ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीत पुनित तेवानी हा पार्टनर असून त्याचे नोएडा येथे ऑफिस आहे आणि तो आता शेअर बाजार संबंधित विविध चॅनलवर एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहे असे सांगायचा. पुनित हा त्याला फेसबुकवर म्युच्युअल फ्रेंडही आहे, असे सांगून छाप पाडायचा, असे सांगितले जायचे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here