शेतकरी ऊस उत्पादन करण्यापेक्षा राजकारणात अधिक लक्ष घालतात यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे : शरद पवार

0

निफाड,दि.15: कमीत कमी पाण्यात ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे. ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादन करण्यापेक्षा राजकारणात अधिक लक्ष घालतात. यामुळे शेतकरी अडचणीत येत असून शेतकऱ्यांनी आपले पीक चांगले कसे येईल यासाठी प्रयत्न करावे त्यातून चांगला मोबदला शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांची साथ असेल तर रानवड कारखान्याला यश नक्कीच मिळेल यात कुठलीही शंका नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला.

स्वर्गीय अशोकराव बनकर नागरिक सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखानाच्या 39 वा गळीत हंगामाचा शुभारंभ काल (दि.14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी कारखानदारीवर भाष्य केले. कारखानदारी हा धंदा आहे, राजकारण नाही असे पवारांनी यावेळी म्हटले आहे. आज हा कारखाना सुरू झाला आहे. ही कारखानदारी अत्यंत महत्वाची आहे. ऊस हा अत्यंत महत्वाचा धागा आहे. उसाला कमीत कमी पाण्यात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. याकडे लक्ष द्या, ऊस उत्पादन वाढेल, असेही पवार यावेळी म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात राज्याच्या कारखानदारीचे नेतृत्व पूर्वी होत होते. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी राज्यातील कारखानादारांचे नेतृत्व केले. कुठलीही गोष्ट ठरविली ती योग्य असेल तर त्यात तडजोड करायची नाही असे काकासाहेब वाघ यांचे नेतृत्व होते. त्यांनी सुरू केलेला कारखाना हा बंद झाला आणि आता हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची हिंमत आमदार दिलीप बनकर यांनी दाखविली ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

सहकारी कारखान्यांचा जन्म हा मुळात महाराष्ट्रात झाला. या कारखान्यांनी राज्यातील ऊस उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले. पूर्वी साखर एक साखर एवढेच साखर कारखान्याचे चक्र होते आता ती परिस्थिती बदलली आहे. केवळ साखर नव्हे तर इथेनॉल, वीज आणि हायड्रोजन निर्मिती करण्याची गरज आहे. कारखान्यात जर या चार प्रकारची निर्मिती करण्यात आली तर नक्कीच साखर कारखाने यशस्वी होऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. राज्यातील काही कारखान्यांनी हा प्रयोग केला आहे. तो आपणही करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच यासाठी आवश्यक ती मदत आम्ही करी असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here