Fake News: खोट्या बातम्या व देशविरोधी बातम्या दाखवणाऱ्या यूट्यूब चॅनेल (YouTube Channel) व वेबसाईटवर (Website) केंद्र सरकारने (Central Government) बंदी घातली आहे. 20 यूट्यूब चॅनल्स आणि 2 वेबसाईट्सवर (Website) बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी माहिती त्याचप्रमाणे खोट्या बातम्या प्रसारीत केल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारनं 20 युट्युब चॅनेल्स आणि 2 संकेत स्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. गुप्तचर यंत्रणेसोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं (Ministry of Information & Broadcasting) संयुक्तपणे याबाबत आधी आढावा घेऊन अखेर ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.
देशविरोधी कंटेट दाखवल्यामुळे कारवाई
दरम्यान, ज्या 20 युट्युब चॅनेल्स आणि 2 संकेत स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांनी राष्ट्रविरोधी माहिती प्रसारीत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांनी खोट्या बातम्या प्रसारीत करुन राष्ट्राविरोधी काम केल्यानं त्यांना ब्लॉक करण्यात येत असल्याचं सांगितलं गेलंय. गेल्या सोमवारी याबाबतच्या कारवाईचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
Fake News देणाऱ्यांना केंद्र सरकारचा दणका
पाकिस्तानातून या यूट्यूब चॅनेल आणि वेबसाईटचं काम चालत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. भारताविरोधात काम करणाऱ्या या चॅनेल्सवरील कारवाईनंतर आता राष्ट्रविरोधी कंटेट तयार करणाऱ्यांनाही दणका बसेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
खोटी माहिती देण्याचे काम केल्याने कारवाई
काश्मीर, सैन्य, अल्पसंख्याक, राम मंदिर, सीडीएस बिपीन राव, यांसारख्या संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात होती, असं केंद्र सरकारनं म्हटलंय. याच युट्युब चॅनल्सवर शेतकरी आंदोलन, सीएए आंदोलन आणि अल्पसंख्यांकाना भडकवण्याचंही काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकशाहीविरोधी काम करणाऱ्या या युट्युब चॅनेल्सद्वारे आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही चुकीची माहिती प्रसारीत केली जाऊ शकते, अशी भीती केंद्रानं व्यक्त केली आहे.