सोलापूर,दि.२०: बोगस साठेखत करून फसवणूक प्रकरणात न्यायालयाने शेतकऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात आरोपी शिवाप्पा आडव्याप्पा व्हनमाने रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर या आरोपीस बोगस साठेखत करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकिकत अशी की, फिर्यादी हे अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर गावात त्यांच्या शेती गट नं. ९३/२ मध्ये वस्ती करून राहणेस आहेत. सन २००२ साली फिर्यादी यांनी त्यांच्या जमिनीमध्ये त्यांचे नातेवाईक आरोपी शिवाप्पा आडव्याप्पा व्हनमाने यांना राहण्यासाठी १ गुंठा जागा तात्पुरती दिली होती. आरोपीने सदर जागा घेताना मी दुसरी जागा घेऊन घर बांधेपर्यंत येथे राहतो असे सांगितले होते.
परंतु आरोपी फिर्यादीच्या शेतातील झाडे तोडणे तसेच अतिक्रमण करणे असे काम करत होता. दि. १३/०६/२०२५ रोजी फिर्यादी यांनी शिवाप्पा व्हनमाने यांना त्यांची जागा खाली करण्यास सांगितले असता आरोपी शिवाप्पा व्हनमाने याने फिर्यादी व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करून धमकी देऊन मारहाण करू लागला.
त्यावेळी गावातील काही लोक तेथे आले व त्यांनी आरोपीला तू फिर्यादीच्या शेतात फार दिवस झाले राहत आहे. तसेच त्यांच्या शेतात अतिक्रमण करत आहे आता फिर्यादीला जागेची गरज आहे तू जागा सोड असे सांगितले. त्यावेळी आरोपी शिवाप्पा व्हनमाने यांनी मी सदर जागा बॉंडवर साक्षीदारांसमक्ष खरेदी केलेली आहे असे सांगतिले.
फिर्यादीने सदर बॉंडची मागणी केली असता आरोपी शिवाप्पा व्हनमाने याने तो बॉंड दाखवला. सदर बॉंडवर लिहून देणार म्हणून फिर्यादी यांचे तर लिहून घेणार म्हणून आरोपीचे नाव होते व सदर बॉंड हा फिर्यादी यांच्या नावाने घेतलेला होता. तसेच सदर बॉंड वर सही असलेल्या साक्षीदारांना विचारणा केली असता सदर व्यवहाराबाबत माहित नसल्याचे सांगितले.
तसेच शिवाप्पा व्हनमाने याने फिर्यादीचा बनावट अंगठा व सही करून खोटी कागदपत्रे तयार करून फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. अशा आशयाची फिर्याद मंद्रूप पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती. सदर कामी आरोपी शिवाप्पा आडव्याप्पा व्हनमाने रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर यांनी अॅड. अभिजीत इटकर यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन मिळणे कामी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अर्ज दाखल केलेला होता.
यात आरोपी तर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की सदर आरोपी व फिर्यादी यांच्यामधील वाद हा दिवाणी स्वरूपाचा असून त्यास फौजदारी स्वरूप देऊन आरोपीवर दबाव आणण्यासाठी सदरची केस केली आहे. त्यामुळे सदर आरोपी शिवाप्पा व्हनमाने याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा.
सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी शिवाप्पा आडव्याप्पा व्हनमाने रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजीत इटकर, अॅड. राम शिंदे , अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.








