मुंबई,दि.31: एनसीबीचे समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. समीर वानखेडे कुटुंबियांवर सातत्याने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे आरोप करत आहेत. नवाब मलिक यांनी वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला होता. तसेच वानखेडे यांनी धर्म बदलून नोकरी मिळविल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांच्याकडून वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे वानखेडे कुटुंबीयांनी आरपीआयचे रामदास आठवले यांची भेट घेतली. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे यांनी आठवले यांची भेट घेतली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांना पाठिंबा जाहीर दिलाय. समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज रामदास आठवले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी वानखेडे कुटुंबीय आणि आठवले यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्याला त्यांचे सर्व कागदपत्र दाखवलाचं आठवले म्हणाले. तसंच पत्रकार परिषद घेत आठवले यांनी मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत.
नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यामुळेच मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा वळवल्याचा गंभीर आरोप आठवले यांनी केलाय. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. ते मुस्लिम कधीच नव्हते. त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. ते उच्चशिक्षित आहेत. एक्साईज विभागात त्यांनी काम केलं आहे. त्यांनी सर्व कागदपत्र आम्हाला दाखवली आहेत. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवावेत, असं आवाहनही रामदास आठवले यांनी केलंय.
नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीने कारवाई केल्यानेच नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत असल्याचे क्रांती रेडकर यांनी सांगितले. तसेच हे ड्रग संबंधित प्रकरण असताना एखाद्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती सार्वजनिक करण्याची काय गरज आहे? असा प्रश्नही क्रांती रेडकर यांनी केला आहे. बोलायचे तर ड्रग संदर्भात बोलायचे. कारवाई आणि जातीचा काय संबंध आहे? असेही रेडकर यांनी म्हटले आहे.
कोर्टात जा, पण बदनामी करू नका
यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका, असं त्यांनी सांगितलं.
समीर वानखेडे फ्रॉड नाही
नवाब मलिक मोठे नेते आहेत. आमच्याही पाठी मोठा नेता आहे. आम्ही त्यांच्या मदतीने तुम्हाला पुरावा देणार आहोत. त्यामुळे समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक आहेत हे दिसून येईल, असं सांगतानाच आठवले आमच्यासोबत आहे. ते दलितांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. आम्ही आठवलेंना सर्व माहिती दिली आहे. त्यांना पूर्ण पुरावे दिले आहेत. त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत. कास्ट सर्टिफिकेटपासून मॅरेज सर्टिफिकेटपासून त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.








