सोलापूर,दि.27: निवडणूक आयोगाने ओपिनियन आणि एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजेपासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.
त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.