शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिली डेडलाईन, धनुष्यबाण चिन्ह कुणाला?

0

नवी दिल्ली,दि.4: शिवसेनेला (Shivsena) निवडणूक आयोगाने डेडलाईन दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेवर व धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्हावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधीच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना कुणाची? या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये चेंडू टोलावला आहे. शिवसेनेनं 23 सप्टेंबरला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितली होती. 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत ठाकरे गट कोणती कागदपत्र सोपवणार आहे. 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष म्हणजे, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिंदे गटाने सुद्धा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह द्यावं लागणार आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाचा असा आहे प्लॅन?

दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाने आधीच याला पाठिंबा दिला आहे. पण अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव गटाला अडचणीत आणण्याची शिंदे गटाने रणनीती आखली आहे. पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला न्यायालयीन दणका देण्यासाठी शिंदे गटाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनुष्यबाण चिन्ह मिळू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट न्यायालयीन लढाई लढणार आहे. न्यायालयीन लढाईत शिंदे गटाकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आणि ठाकरे गटासमोर पेच निर्माण करण्यासाठी ही चाल खेळली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here