मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक केसरकर यांच्याबाबत घेणार मोठा निर्णय?

0

मुंबई,दि.७: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. ते सातत्याने शिंदे गटाची भूमिका मांडत आहेत. याचवेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमचे नेते असल्याचा वारंवार उल्लेख केला आहे. आतापर्यंत दीपक केसरकर यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून ते भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यापर्यंत अनेकांवर टीकेचे आसूड ओढले. मात्र, नारायण राणे यांच्याशी घेतलेला पंगा दीपक केसरकर यांना महागात पडण्याची शक्यता असून, प्रवक्तेपदी किरण पावसकर यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

दीड महिन्यातच दीपक केसरकरांकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्या ३ आठवड्यांपासून अनेक पत्रकार परिषदांमधून केसरकरांनी भाजप-शिंदे गटात कटुता निर्माण होईल, अशी विधाने केल्याने भाजपचे काही आमदार नाराज आहेत. त्यांनी केसरकरांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही भाजप आमदारांनी केसरकरांविरोधात तक्रारीचा पाढा वाचला आहे. त्याचमुळे केसरकरांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दीपक केसरकर यांची राणेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. राज्यात शिंदे-फडणवीसांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असली तरी संधी मिळेत तेव्हा केसरकर नारायण राणेंवर तोफ डागत राहिले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केलेल्या गंभीर आरोपांनंतर नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केसरकरांची तक्रार केली. इकडे एकनाथ शिंदे यांच्या कानावरही केसरकरांच्या अनेक तक्रारी गेल्याची माहिती आहे. या कारणांमुळे दीपक केसरकरांना हटवून त्यांच्या जागी किरण पावसकर यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here