दि.26: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत शिवसैनिकांना नवा संदेश दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याबरोबर सत्तेत राहिल्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे असे म्हणत बंडखोरी केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या जवळजवळ 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे थांबले आहेत.
याच आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोड घडत असताना राज्यात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निदर्शनं केली जात आहेत. तसेच बंडखोर आमदारांचे कार्यालये फोडली जात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वूमीवर एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसैनिकांना एक संदेश दिला आहे. महाविकास आघाडीसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
याआधी एकनाथ शिंदे यांनी अनेक बंडखोर आमदारांचे व्हिडीओ संदेश तसेच पत्र समाजमाध्यमांवरुन प्रसारित केले आहेत. महाविकास आघाडी शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप या बंडखोर आमदारांनी केला आहे. यात कारणामुळे एकनाथ शिंदे यांचे समर्थक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेल्या शिवसेनेच्या दुसऱ्या गटाची स्थापन करत आहेत. तशा हालचाली शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. तर बाळासाहेब आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून शिवसेनेशिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला करता येणार नाही, असा ठराव शिवसेनेने आजच्या कार्यकारिणी बैठकीत संमत केला आहे.