Eknath Shinde: तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मी मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे

0

मुंबई,दि.४: विधानसभेत विश्वासमत दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, असा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

सन २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार येणार नाही, हे निश्चित झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी वाटाघाटी सुरू होत्या. त्यावेळी मी मुख्यमंत्री होणार हे जवळपास नक्की होते. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करण्याचं ठरलं होतं. नंतर अजित पवार आणि कुणीतरी सांगितलं मी नको, उद्धव ठाकरेंना करा. मी काहीही बोललो नाही. मला सत्तेची हाव नाही. मात्र, नंतर निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अजित पवार कामांसाठी पुढे असतात. ते एकदम रोखठोक बोलतात. मला त्यांचा स्वभाव आवडतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

युतीसाठी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो

अनेक आमदार यायचे आणि म्हणायचे आपली नैसर्गिक युती भाजपासोबत आहे. यानंतर मी ५ वेळा उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. याला दीपक केसरकर साक्षीदार आहेत. मात्र, याचा परिणाम झाला नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मी कधीही कोणत्याही पदाची लालसा धरली नाही. यापुढेही करणार नाही. यानंतरही मी सगळे विसरूनही गेलो होतो. मी कोणतीही अपेक्षा धरली नाही. सुरुवातीला मलाच सांगितले होते. मात्र, नंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास सांगितले. तेव्हाही मी कोणताही आक्षेप घेतला नाही. तेव्हा साहेब तुम्ही पुढे व्हा. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. मात्र, त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. माझ्यासोबत आलेले मंत्रीही सत्तेत असताना बाहेर पडले नसते, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे यांनी भाजप, शिवसेनेच्या आमदारांचा मी मुख्यमंत्री नाही, तर शिवसेनेच्या त्या १५ आमदारांचाही मुख्यमंत्री आहे. एवढेच नाही तर अजितदादा आमचेच आहेत. मी माड्या बांधल्या नाही, हॉटेल बांधली नाहीत. आहेत का हो आव्हाड साहेब, अशा शब्दांच शिंदे यांनी राष्ट्रवादीला कोपरखळी मारली. नगरविकास मंत्री होतो, तेव्हा मी आमदारांना खूप पैसे देत नव्हतो, थोडे थोडे देत होते. कारण काही जण वॉच ठेवून होते, भाजपच्या आमदाराला जास्त पैसे तर देत नाही ना, असा टोलाही त्यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाला लगावला. 

दरम्यान, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर बोलताना, दादांनी शंभर प्लसचे टार्गेट ठेवले होते. जयंत पाटील तर आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सांगायचे पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच. यामुळे आमचे आमदार चलबिचल झाले. ते मला येऊन भेटायचे. मी मोकळाच होतो, यामुळे मी त्यांचे ऐकून घ्यायचो. चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यातील सेनेचे पदाधिकारी गेल्या सहा महिन्यांपासून बाहेरच होते. जिल्ह्यात जात नव्हते. एका पदाधिकाऱ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या घरच्यांकडे गेले, त्याला राष्ट्रवादीत ये एक सुनावणी लावू आणि सगळे गुन्हे रद्द करू, हे जयंत पाटांलाना माहितीय असे मी म्हणत नाही, असेही शिंदे म्हणाले. 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

“महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मी राज्याचा मुख्यमंत्री होणार होतो. पण नंतर अजित पवार किंवा इतर कोणीतरी म्हटलं की मला मुख्यमंत्री बनवू नका. त्यावेळी मी म्हटलं मला काहीही अडचण नाही, उलट मी उद्धव ठाकरेंना म्हटलं की त्यांनी पुढे यावं मी तुमच्यासोबत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, माझी मुख्यमंत्रीपदावर कधीही नजर नव्हती,” असे शिंदे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here