मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी अमित शहा यांचे हस्तक होऊ: एकनाथ शिंदे

0

पैठण,दि.१२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी अमित शहा यांचे हस्तक होऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी मंत्री संदीपान भुमरेदेखील दिलेला शब्द पाळतात, असं सांगितलं. ते सोमवारी (१२ सप्टेंबर) औरंगाबादमधील पैठणच्या सभेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “संदीपान भुमरेंनी सांगितलं की, मी राजकारणात दिलेला शब्द पाळतो म्हणून एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला. मला बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही.”

पैठणच्या सभेत एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे कौतुक केले. शिंदे म्हणाले की, ‘निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मतं मागितले होते. लोकांनी भाजप-सेनेला सत्तेत आणले, पण यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली. भारताचा शत्रू असलेल्या मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण यांच्याच काळात झाले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही नरेंद्र मोदी-अमित शहा यांचे हस्तक होऊ.’

शिंदे पुढे म्हणाले, ‘आमच्यावर साबणाचे बुडबुडे अशी टीका विरोधक करत होते. पण, याच साबनाने आम्ही तुमची धुलाई केली. बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. पण, आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला अन् मविआला पुरून उरले. पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. आम्ही लोकभावनेचा मान ठेवला,’ असंही शिंदे म्हणाले.

“संदीपान भुमरेदेखील तसेच आहेत. एकदा ते माझ्याकडे आले, कधी आले ते मी सांगत नाही. शहाजीबापू म्हणाले आम्ही सगळे एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नेलं नाही, तर आम्हीच त्यांना नेलं. ही वस्तूस्थिती आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “जेव्हा अन्याय झाला, मुस्कटदाबी झाली, तेव्हा संदीपान भुमरे आले आणि म्हणाले काय करायचं? मी म्हटलं काय करायचं, चाललंय ते चालू द्या. ते म्हणाले असंच चाललं तर पुढच्या निवडणुकीत हाताच्या बोटाएवढेही आमदार येणार नाहीत. मी म्हटलं मी ठीक आहे, मला काहीच अडचण नाही. त्यावर म्हणाले, तुम्हाला अडचण नाही, पण सर्व आमदारांना अडचण आहे, जनतेला अडचण आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here