Eknath Shinde On Maratha Protesters: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

0

मुंबई,दि.२: Eknath Shinde On Maratha Protesters: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना बळजबरीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर वाद होऊन पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण उपोषणाला बसले होते. पण, पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलनस्थळी दगडफेक झाली. तर, पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर जालन्यात बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले… | Eknath Shinde On Maratha Protesters

“जालन्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वत:हा उपोषकर्त्याबरोबर चर्चा केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या. अशा प्रकारची घटना होणं, योग्य नाही. एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं, ‘मनोज जरांगे-पाटीलची तब्येत खालावत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती.’ पण, ही दुर्दैवी घटना घडली आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना दिली.

“टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांची उपसमिती वारंवार बैठका घेत आहे. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहे. मात्र, घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. संबंधितांवर कारवाई केली जाईल,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

लाठीचार्ज का करण्यात आला? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “पोलिसांनी सांगितलं, मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, लोकांनी अडवणूक केली. त्यातून दगडफेक झाली. यानंतर लाठीचार्ज झाला. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करू नये, अशी सरकारची भूमिका आहे.”

“मराठा समाजातील आंदोलक आणि समन्वयकांनी शांतता राखावी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा सर्वांचा उद्देश आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here