मुंबई,दि.६: एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर MLA Sada Sarvankar) यांनी मनसेबाबत (MNS) मोठं विधानं केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपानं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मनसेच्या एका आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं. आता भाजपा आणि मनसेची जवळीक वाढल्याचं काही लपून राहिलेलं नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही (Raj Thackeray) भेटीगाठी घेऊ लागले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्याचं निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’वर सदा सरवणकर भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर देखील उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे हे हिंदूजननायक असल्याचं सदा सरवणकर यांनी सांगितलं. बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि मनसेची भूमिका एकच असल्याचं देखील सदा सरवणकर यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी तब्येत नाजूक असताना देखील मला भेटण्यासाठी वेळ दिला. त्यांचा मी नेहमीच आदर करतो, असं सदा सरवणकर म्हणाले.
दरम्यान, मनसेच्या स्थापनेनंतर दादर परिसरात वर्चस्व निर्माण करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जबर धक्का दिला होता. पण हे यश कायम राखण्यात मनसेला अपयश आलं. शिवसेनेनं सदा सरवणकर यांचं तिकीट कापून आदेश बांदेकर यांना दिल्यानंही सरवणकर नाराज होते. पण २०१९ च्या निवडणुकीत संधी मिळून आमदार झालेले सदा सरवणकर शिंदे यांच्या बंडानंतर थेट त्यांच्या गटात सामील झाले.