लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय भूकंप होणार असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा

0

मुंबई,दि.12: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय भूकंप होणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (दि.12) शिवडी-नाव्हा शेवा सागरी सेतूचं उद्घाटन झालं. यावेळी शिंदे बोलत होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. यावेळी शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी जी यांनी पूर्ण केले आहे. मोदी जी लक्षद्वीपला गेले आणि मालदीव मध्ये भूकंप झाला. देशाची बदनामी सहन करणार नाही असा कठोर इशारा त्यामुळे या देशाला मिळाला. देशोदेशीचे पंतप्रधान जी-20 समेटसाठी भारतात येतात मोदींचा सर, बॉस असा उल्लेख करत त्यांना नमस्कार करतात, पाया पडतात हे देशाचे सामर्थ्य जागतिक पातळीवर वाढले असल्याचे प्रतीक असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला अटल सेतू हा भूकंपाचे मोठमोठे धक्के सहन करण्यास सक्षम आहे. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे. त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.

अबकी बार 400 पार

अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या रावणाचा अंत करण्यासाठी श्रीरामांनी समुद्रात जसा रामसेतू उभारला होता, तसंच महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या या अटल सेतूमुळे अहंकारी लोकांचा अहंकार मिटेल, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. “अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार”, असा नारा एकनाथ शिंदे यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here