Eknath Khadse: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात आंदोलन

0

जळगाव,दि.14: Eknath Khadse: जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. गेल्या 16 तासांपासून एकनाथ खडसे पोलीस स्टेशनला ठिया मांडल्यानंतर शहर पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर आंदोलन सुरू केले. रस्त्यावरच एकनाथ खडसे यांनी रात्री मुक्काम केला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा एकनाथ खडसे यांनी पवित्रा घेतला आहे.

मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला आहे. अर्ज दाखल करुन घेतला असला तरी गुन्ह्याची नोंद अद्यापही केली नाही. त्यामुळं गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळं पोलिसांची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.

दरम्यान, रात्री उशिरा एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पोलिसांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. चोरीच्या गुन्हात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना फरार करण्यात मदत केल्याचा गंभीर आरोप खडसेंनी पोलिसांवर केला आहे. एखाद्या चोरीचा गुन्हा नोंदवण्यात येण्यासाठी आपल्यासारख्यांवर जर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दूध संघातील चोरीच्या गुन्हात जोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आपण आपले आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला.

नेमकं प्रकरण काय?
जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एकनाथ खडसे यांच शहर पेालीस ठाण्यात आंदोलन सुरु होते. मात्र, पोलिसांकडून कुठलीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस याप्रकरणात कुठलीही नोंद घेत नसल्याने यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा चांगलाच संताप झाला. तब्बल आठ उलटल्यानंतर अखेर याप्रकरणात पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेतली आहे. तर दुसरीकडे दूध संघात अपहार झाला आहे, असे आंदोलन सुरु झाल्यापासून सांगणाऱ्या एकनाथ खडसेंनी युटर्न घेत आता याप्रकरणात अपहार नव्हे तर चोरी झाल्याचे बोलतांना सांगितले आहे. दरम्यान खडसेंच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

जिल्हा दूध संघांत मालाच्या तपासणीत दूध संघातून 14 टन 80 लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्याचे भासवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आलेल्या नाही. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात 30 ते 35 लाख रुपये किंमतीच्या 360 बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले असून संबंधित माल हा दूध संघातील अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरांनी चोरी केल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. या तक्रारीनुसार संशयित आरोपी कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा असे लिमये यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

आठ तासानंतर घेतली तक्रार

एकनाथ खडसेंच्या तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी तक्रार घेतली आहे. दूध संघात अपहार नव्हे तर दूध संघात चोरी झाल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. केवळ फिर्याद घेतल्याची पोलिसांनी पोहोच दिली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळं आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here