जळगाव,दि.4: Eknath Khadse: मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर कारवाई केली आहे. नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. नेहमीच दहशतवादावर आक्रमक असणाऱ्या भाजपावर (BJP) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इकबाल मिर्ची हा दहशतवादी आहे. त्याचप्रमाणे दाऊदच्या नातेवाइकासोबत भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकमध्ये जेवण केल्याचे भाजपला कसे चालते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.
एकनाथ खडसे म्हणाले, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. दाऊदच्या नातेवाइकासोबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये जेवण केले. मग त्यांचे संबंध आहेत असे म्हणता येईल का? असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित केला.
याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असे असेल तर भाजपने याचा खुलासा केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तर एकनाथ खडसेंची मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्यांनी केलेल्या विधानांबाबत काही बोलावे असे वाटत नाही. माझ्याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार करावी. सध्या ते मनात येईल तसे बडबडत असतात, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.