ठाणे,दि.२२: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मंगळवारी दुपारनंतर कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.
ईडीने पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीवर ही मोठी कारवाई केली आहे. पाच बँकेतील खाती आणि शेअर्स देखील सील केली आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हाती एक वेगळा मुद्दा हाती लागला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून त्यासंदर्भात ईडीनं मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक एंट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचं कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं गेलं. त्याच पैशातून या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, असं सांगितलं जात आहे. तसेच, भविष्यात श्रीधर पाटणकर यांची देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.