EDने शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना केली अटक

0

मुंबई,दि.२: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत (Pravin Raut) यांना अटक करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं (Enforcement Directorate) ही कारवाई केली आहे. बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. प्रविण राऊत एचडीआयएलची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरुआशिष कंस्ट्रक्शनमध्ये संचालक आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांचे प्रवीण राऊत हे निकटवर्तीय आहेत. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. त्यांची अनेक तास चौकशी केली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने राऊत यांना अटक केल्याची माहिती आहे.

गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगण्यात येत आहे. एचडीआयएल रिअल इस्टेट या कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यात एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रवीण राऊत यांच्या विरोधात अटकेची कारवाई केली.

राऊत यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे मारल्यानंतर राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेऊन चौकशी सुरू केली होती. मात्र, अनेक तासांच्या चौकशीनंतरही तपासात सहकार्य न केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना अटक केली. अधिक माहितीनुसार, डीएचआयएल या कंपनीची उपकंपनी असलेल्या गुरूआशिष कंस्ट्रक्शन कंपनीला म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने एफएसआय घोटाळ्यात मदत केल्याप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे. काही वर्षांपूर्वी गोरेगावच्या सिद्धार्थ नगरातील पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरूआशिष कंस्ट्रक्शनतर्फे करण्यात येणार होते. काही वर्षांपूर्वी सदनिका न बांधताच फसवणूक करून एफएसआय विकण्यात आल्याचे समोर आले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here