ईडीकडून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक

0

नवी दिल्ली,दि.३०: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendar Jain) यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. मनी लाँड्रींगप्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ईडीनं ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती देखील जप्त केली होती. आता थेट अटकेची कारवाई झाल्यानं केजरीवाल सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

यापूर्वीदेखील एप्रिल महिन्यात ईडीने सत्येंद्र जैन यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपाने आम आमदी पार्टीला लक्ष्य केलं होतं. तसेच दिल्लीमधील आपचे सरकार बरखास्त करण्याची मागणी घेऊन भाजपाने दिल्लीमधील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते.

सत्येंद्र जैन यांनी २०१५-१६ मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत. 

दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्यावर ११.७८ कोटीचा हवाल्याचाही आरोप आहे. २०१०-१२ दरम्यान बनावट कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इन्कम टॅक्स विभागाने बेनामी संपत्ती कायद्याच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे आहे. सीबीआय सुद्धा त्यांची चौकशी करत आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here