EC On NCP: निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत

0

नवी दिल्ली,दि.21: EC On NCP: निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का देण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोगाने नुकताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाखाली राहू शकत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एखादा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.

राष्ट्रवादीचे घड्याळ जाणार? | EC On NCP

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीप्रमाणेच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं होतं. पण राज्यांमधल्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.

1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीने केलेल्या अपीलवर निवडणूक आयोगाचं समाधान झालं नाही, तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here