मुंबई,दि.19: लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) अस्थायी रुपात स्थगित करण्यात आली आहे. महायुती सरकारने महिलांसाठी ही योजना लागू केली होती. पात्र महिलांना महिन्याला 1500 मिळणार आहेत. महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.4 कोटींहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले आहेत.
मात्र निवडणुकीच्या काळात यापुढे महिलांना पुढील हफ्ता मिळणार नाही. कारण लाडकी बहीण योजना अस्थायी रुपात स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीकरिता मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचार संहिता लागू असताना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजनांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला आणि बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी आवश्यक निधी रोखण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र महिलांना निवडणुकीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकणार नाही. यादरम्यान राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्र पाठवले होते. त्यामुळे आता डिसेंबरचा हफ्ता येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.