मान्सूनचे होणार लवकर आगमन, येत्या आठवड्यातच पावसाची शक्यता

0

मुंबई,दि.१२ः हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात एकीकडे नागरिक उकाड्याने हैराण आहेत तर दुसरीकडे मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

राज्यात वारंवार हवामानात बदल होत आहेत. सध्या असानी चक्रीवादळामुळे राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे. अशात येत्या ३ आठवड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. खरंतर, यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. १३ ते १९ मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार आहे.

दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.’

दरम्यान, असानी चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आंध्रप्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. इतकंच नाहीतर या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांत होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटका, केरळमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here