महाराष्ट्रातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

0

मुंबई,दि.31: महाराष्ट्रातील 40 तालुक्यात दुष्काळ (Maharashtra Drought) जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही तालुक्यांमध्ये दुष्काळजाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश (GR) सरकारने जाहीर केला आहे. एकूण 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे.

येत्या काळात महाराष्ट्रावर दुष्काळाचे गडद संकट पहायला मिळणार आहे. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. येथील परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. जालना (Jalna), छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, करमाळा, सांगोला व माढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या मंडळांमध्ये कमी पाऊस झाला आहे त्याबाबतीत आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळाकरिता योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्याच्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येईल.

दुष्काळ जाहीर झालेल्या भागांना या सवलती मिळणार

  • जमीन महसुलात सवलत
  • पिक कर्जाचे पुर्नगठन
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसूलीची स्थगिती
  • कृषीपंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सवलत
  • शाळा महाविद्यालयातील विद्यार्थांचे परीक्षा शुल्क माफ
  • रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात काही अंशी शिथिलता
  • आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टॅंकरने पुरवण्याची मुभा
  • टंचाई झालेल्या भागातील शेतक-यांच्या शेतीतील वीजपंपांची वीज खंडीत न करणे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here