सोलापूर,दि.६: आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे (Dr. Omprakash Shete) यांनी यशोधरा आणि कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयास भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत रुग्णांबरोबरच नातेवाईकांनाही शासकीय उपचार योजनांची माहिती देण्याच्या सूचना रुग्णालयातील आरोग्य मित्रांना दिल्या. डॅा. शेटे यांच्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत शासकीय योजनेतून रुग्णालयात उपचार मिळाले आहेत. गरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी डॅा. शेटे सतत प्रयत्नशील असतात.
शुक्रवारी, सोलापूर दौऱ्यावर आलेल्या डॉ. शेटे यांनी यशोधरा हॉस्पिटलला भेट देत रुग्णांची विचारपूस केली. त्यापैकी पाच रुग्णांना शासकीय उपचार योजनेची माहिती नसल्याचे दिसून आले. या भेटीदरम्यान यशोधरा हॉस्पिटलचे प्रशासकीय उपअधिकारी सुखांत बेले, वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.
त्यांनी रुग्णांशी सुमारे तासभर संवाद साधून व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. त्यानंतर आवश्यक सूचना दिल्या . त्यानंतर त्यांनी कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्ण व नातेवाईकांची भेट घेऊन उपचार व्यवस्थित सुरू आहेत का, योजनांची माहिती दिली जाते का, याची खातरजमा केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी, आरोग्य अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर करजखेडे आदी अधिकारी उपस्थित होते.
रुग्णालयांनी आरोग्य मित्रांची नेमणूक करणे बंधनकारक
शासकीय उपचार योजनांचा लाभ पात्र रुग्णांना मिळावा यासाठी रुग्णालयाच्या दर्शनी भागात शासकीय योजनांची माहिती देणारे फलक लावणे आवश्यक आहे. रुग्णांची काळजी घेणे, त्यांना कागदपत्रांची व योजनेची प्रक्रिया समजावून सांगणे ही आरोग्य मित्रांची जबाबदारी आहे. त्यामुळे आरोग्य मित्रांची भूमिका महत्त्वाची असून रुग्णालयांनी आरोग्य मित्रांची नियुक्ती करणे बंधनकारक असल्याची सूचना डॉ. शेटे यांनी रुग्णालयांना केली.








