नवी दिल्ली,दि.१४: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा अधिक कडक वाटाघाटी करणारे आहेत. माझी आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की अमेरिका ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर’ (IMEC) बांधण्यासाठी एकत्र काम करण्यास तयार आहे. ट्रम्प म्हणाले की हा मार्ग इटलीहून अमेरिकेत जाईल. त्यांनी त्याचे वर्णन सर्वात मोठ्या व्यापारी मार्गांपैकी एक म्हणून केले.
बरोबरी होऊ शकत नाही
पंतप्रधान मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की, तुमच्या दोघांपैकी कोण अधिक कठोर वाटाघाटी करणारा आहे. यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा खूपच कठोर वाटाघाटी करणारे आहेत. ते माझ्यापेक्षा खूप चांगल्या वाटाघाटी करणारे आहेत. माझी त्यांच्याशी बरोबरी होऊ शकत नाही.
ऊर्जा क्षेत्रात करार
ट्रम्प यांनी ऊर्जा आयात करार आणि व्यापार मार्गांवरील करारांचीही घोषणा केली. ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मी ऊर्जेबाबत एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारामुळे अमेरिका भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा प्रमुख पुरवठादार बनेल. अमेरिकेच्या अणु तंत्रज्ञानाचे स्वागत करण्यासाठी भारत कायद्यांमध्येही सुधारणा करत आहे.