ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिक यांच्या विरोधात केला मानहानीचा दावा

0

मुंबई,दि.7: क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कारवाई करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक केली होती. ड्रग पार्टीवर करण्यात आलेली कारवाई बोगस होती असा दावा राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला होता. तसेच वानखेडे यांनी धर्मांतर करून नोकरी मिळविल्याचा दावाही केला होता. नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने पत्रकार परिषद घेत आरोप करत आहेत.

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन एकामागून एक गौप्यस्फोट करण्याचा धडाका सुरुच ठेवला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत. सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केल्यानंतर समीर वानखेडे दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षांची भेट घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादरही केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. मात्र वानखेडेंवर आरोपांवर आरोप होत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here