मुंबई,दि.8: राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांचे ट्विटची चर्चा सुरू आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडत मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर ठाणे महापालिकेतील माजी 66 नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले. नवी मुंबई, कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकही शिंदे गटात सामिल झाले आहेत.
शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. विधिमंडळाच्या लढाईत त्यांचा एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाकडून पराभव झाला. त्यानंतर ‘धनुष्यबाण’ हे पक्षाचं चिन्ह देखील त्यांच्या हातामधून जाण्याची शक्यता आहे. या लढाईत देखील शिवसेनेनं हार मानली असल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहेत. राऊत यांनी केलेल्या ताज्या ट्विटमधून याचे संकेत मिळत आहेत.
जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं!. जय महाराष्ट्र !. असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय. या ट्विटचा काय अर्थ आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवसेनेला पक्षाचं चिन्ह सोडण्याची जाणीव झाली असून त्याचा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे, असं मानलं जात आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही नव्या चिन्हासाठी तयार राहावं असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. ‘या प्रकरणातील कायदेशीर लढाई आपण लढू पण, नवं चिन्ह मिळालं तर ते चिन्ह सर्वांपर्यंत पोहचवा’ असा आदेश ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी एकनाथ शिंदे हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे आता भर गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आणि शिवसेनेते सुनील प्रभूंना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून हा निर्णय दिला.