Dhirendra Shastri: मुंबई पोलिसांत धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात तक्रार दाखल

0

मुंबई,दि.4: धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा उर्फ ​​धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या विरोधात मुंबईतील (Mumbai News) वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेनं केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवासेनेनं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचंही युवासेनेनं तक्रारीत म्हटलं आहे.

धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात तक्रार

बागेश्वर धाम सरकारविरोधात ही तक्रार मुंबईतील वांद्रे पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

साईबाबांसंदर्भात धीरेंद्र शास्त्रीचं वादग्रस्त वक्तव्य

पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही.”

दरम्यान, बागेश्वर बाबा उर्फ ​​पंडीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचं आयोजन 25 मार्च ते 31 मार्च दरम्यान मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये करण्यात आलं होतं. या चर्चेदरम्यान त्यांनी साईबाबांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आपले परात्पर गुरु शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवाचा दर्जा दिला नसल्याचंही ते म्हणाले होते. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान असल्याचं धीरेंद्र शास्त्री यावेळी बोलताना म्हणाले होते.

याशिवाय ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. पण कोणी कोल्ह्याचं कातडं पांघरुन कोणीही सिंह बनू शकत नाही, हे वास्तव आहे, संत आपल्या धर्माचे असो किंवा तुलसीदास, सूरदासही असोत, हे लोक महान असू शकतात, ते योगपुरुष असू शकतात. पण कोणीही देव असू शकत नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here