सोलापूर,दि.17: सिध्देश्वर परिवाराच्या बैठकीत धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी, असे जनता आणि नेतेमंडळींच्या मनात असेल तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचा होकार सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी दर्शविला आहे. सोमवारी, काडादी यांच्या ‘गंगा निवास’ येथे सिध्देश्वर परिवाराची बैठक झाली.
प्रारंभी काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. अशोक निंबर्गी यांनी प्रास्ताविकात काडादी यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निवडणूक लढवावी, अशी मागणी केली. त्याला उपस्थित सर्वांनीच पाठिंबा दिला. यावेळी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे म्हणाले, 2004 पासून राजकारणापासून अलिप्त राहण्याचा आपण प्रयत्न केला. तरीही काही राजकीय मंडळींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून काडादी आणि शेतकऱ्यांना त्रास दिला. त्यामुळे राजकारणापासून आता अलिप्त न राहता काडादी यांनी सोलापूर दक्षिणमधून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला.
महादेव पाटील, प्रा. विजयकुमार बिराजदार, सिध्दाराम डुणगे, सायबण्णा बिराजदार, अख्तरताज पाटील यांच्यासह सिध्देश्वर परिवारातील अनेक मान्यवरांनी सोलापूर दक्षिणमधून काडादी यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी केली. बैठकीस उपस्थित सर्वांनीच ही मागणी उचलून धरली. त्यानंतर काडादी यांनी सिध्देश्वर परिवारातील सदस्यांच्या भावनांचा आदर करीत निवडणूक लढविण्यासंबंधी होकार दर्शविला.
ते म्हणाले, राजकारणापासून तटस्थ राहूनही काही राजकीय मंडळींनी शेतकऱ्यांची मालकी असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना आणि सिध्देश्वर परिवारातील संस्थांना जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने त्रास देण्याचा प्रयत्न केला. विमानसेवेला कारखान्याच्या चिमणीचा अडथळा होत नसताना आणि कोणत्याही न्यायालयाचा आदेश नसताना भाजपने कारखान्याची चिमणी पाडून शेतकऱ्यांच्या घरादारांवर नांगर फिरवला. यातून कारखान्याचे मोठे नुकसान झाले. हे किती दिवस सहन करायचे. आता सर्व जनतेच्या आणि नेतेमंडळींच्या मनात आपण निवडणूक लढवावी, अशी इच्छा असेल तर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे काडादी यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचा आदेश आल्यास पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा शब्द काडादी यांनी उपस्थितांना दिला. तेव्हा त्यांच्या या निर्णयाचे सिध्देश्वर परिवाराने टाळ्यांच्या गजरात स्वागत केले आहे.
काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?
गंगा निवास येथील बैठकीनंतर सिध्देश्वर परिवाराने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या टाकळी येथील जाई जुई फार्म हाऊस येथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा करून त्यांच्याकडे सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना उमेदवारीची मागणी केली. या बैठकीत शिंदे यांनी काडादी यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून काँग्रेसच्या उमेदवारीवर काडादी निवडणूक लढवत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
गंगा निवासस्थानी झालेल्या बैठकीस गुरुसिध्द म्हेत्रे, वसंत पाटील, विठ्ठल पाटील, प्रा. व्ही. के. पाटील, चिदानंद कोटगोंडे, शंकर पाटील, लहु माशाळे, रमजान नदाफ, कृष्णप्पा बिराजदार, बाळासाहेब बिराजदार, अप्पासाहेब पाटील, संगमेश पाटील, मल्लिकार्जुन नरोणे, मधुकर बिराजदार, शंकर टाकळी, राजकुमार सगरे, प्रभाकर दिंडोरे, रमेश बावी, राजशेखर भरले, सूर्यकांत पाटील, सोमनाथ कोळी, सतीश पाटील, अनिल पाटील, इरण्णा पाटील, गुरुसिध्द पाटील, गुरुबाळा पाटील, राधाकृष्ण पाटील, योगप्पा हन्नुरे, सुभाष पाटील, हरीश पाटील, तम्मा मसरे यांच्याशिवाय सिध्देश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, संचालक गुरुराज माळगे, शिवानंद पाटील-कुडल, सिध्दाराम व्हनमाने, प्रमोद बिराजदार, महादेव जम्मा, विद्यासागर मुलगे, अरुण लातुरे, अॅड. शिवशंकर बिराजदार यांच्यासह कारखान्याचे आजी- माजी संचालक तसेच प्रभुराज मैंदर्गी, सुभाष मुनाळे, पशुपती माशाळ, सिध्देश्वर बमणी, प्रकाश बिराजदार, शरणराज काडादी आदी उपस्थित होते.