सोलापूर,दि.8: सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी गावभेट दौऱ्यात दक्षिण सोलापूर तालुका आणि जुळे सोलापूरचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार काडादी यांच्या गावभेट दौर्यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडा तांडा, मद्रे, सिंदखेड, संजवाड, औराद, राजूर, बिरनाळ आणि होनमुर्गी या गावांमध्ये नागरिकांनी काडादी यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी श्री स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह सिध्देश्वर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय म्हणाले धर्मराज काडादी?
विकासाची दृष्टी नसलेल्या शिवाय सुडाचे राजकारण करणार्या सत्ताधार्यांमुळे गेल्या दहा वर्षांत दक्षिण सोलापूर तालुक्याचे वाटोळे झाले. संस्थात्मक काम करणे दूरच अनेक सहकारी संस्था मोडकळीस आणण्याचे काम केले. अशा दक्षिण सोलापूर तालुका आणि जुळे सोलापूर विकासापासून वंचित ठेवणार्यांस आता घरी बसविण्याची गरज असल्याचे आवाहन अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले.
शेतकर्यांना नडणारे…
सहकारी क्षेत्रामध्ये श्री सिध्देश्वर साखर कारखान्याने यशाचा मापदंड निर्माण केला आहे. शेतकर्यांच्या ऊसाला चांगला दर देण्याची परंपरा सिध्देश्वर कारखान्याने निर्माण केली आहे. हा कारखाना बंद पाडल्यानंतरच आपले खासगी कारखाने चांगल्या पध्दतीने चालतील हा कुटील डाव मांडणार्यांना आपण सारे चांगलेच ओळखून आहोत. शेतकर्यांना नडणारे भाजप सरकार आणि गेल्या दहा वर्षांपासून सुडाचे राजकारण करणार्या आमदारांना जागा दाखविण्याची गरज असल्याचे काडादी यांनी सांगितले.
सुडाचे, द्वेष भावनेचे राजकारण या आमच्या पूर्वजांनी…
दक्षिण सोलापूर तालुक्याला सर्वसमावेशक नेतृत्वाचा मोठा वारसा आहे. शेवटच्या माणसाच्या मदतीला येण्यासाठी सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते, ब्रह्मदेवदादा माने, गुरूनाथ पाटील, लोकनेते बाबूरावअण्णा चाकोते, दी. शि. कमळे गुरुजी यांच्यासारख्या नेत्यांचा सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा वारसा आपण जपला आहे. सुडाचे, द्वेष भावनेचे राजकारण या आमच्या पूर्वजांनी कधीच केले नाही. संस्थात्मक काम करताना त्यांच्याप्रमाणेच आपण सर्व सहकार्यांना सोबत घेऊन, सगळ्या समाजघटकांच्या सहभागातून तालुक्यात परिवर्तन घडविण्यासाठी आपली उमेदवारी असल्याची ग्वाही काडादी यांनी दिली.
माजी आमदार दिलीपराव माने यांचा पाठिंबा
ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासोबत तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींची आपल्याला साथ आहे. आपल्या उमेदवारीला माजी आमदार दिलीपराव माने यांनीही पाठिंबा दिला आहे. दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेची ही लढाई आहे. ही लढाई तडीस नेण्यासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन काडादी यांनी केले.
‘कॉम्प्युटर’ हे सोळाव्या क्रमांकावर
अपक्ष उमेदवार म्हणून धर्मराज काडादी यांना ‘कॉम्प्युटर’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात कॉम्प्युटर हे प्रगती आणि परिवर्तनाचे प्रतीक असल्याचे काडादी यांनी सांंगितले. पहिल्या मतदान यंत्राच्या 16 व्या क्रमांकावरील ‘कॉम्प्युटर’ या चिन्हावरील बटण दाबण्याचे आवाहन काडादी यांनी केले. अनुक्रमणिकेत धर्मराज काडादी यांचे नाव पहिल्या मशीनच्या सर्वात शेवटी आहे.
हा शुभसंकेत असून काडादी यांच्या…
औराद येथे माजी सभापती अशोक देवकते यांच्या निवासस्थानी धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी बैठक सुरू असतानाच ग्रामदैवत महालिंगराया यांच्या पालखीचे आगमन झाले. हा शुभसंकेत असून काडादी यांच्या उमेदवारीला ईश्वरी अधिष्ठान असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी धर्मराज काडादी यांनी पालखीचे पूजन करून श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सुनीलकुमार कोळी, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, संजीवकुमार कोळी, महादेव पाटील व अन्य उपस्थित होते.