पुणे,दि.११: Sharad Pawar On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा चमत्कार मान्य करावा लागेल असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मध्यरात्री झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून आला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालाबाबत भाष्य केले आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे.ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही,” असे शरद पवार म्हणाले.
“शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरक वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झाले आहे. यामध्ये वेगळे काही नाही. मान्य केले पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे,” असेही शरद पवार म्हणाले.