मुंबई,दि.९: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधीत लोकांकडून जागा खरेदी केल्याचा गौप्यस्फोट केला. राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज खळबळ उडवून दिली. मात्र आता नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा फटाका भिजलेला निघाला होता. मात्र मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केले आहे. आज फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांचा फटाका भिजलेला निघाला. आता उद्या सकाळी मी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हाड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून शहराला कुणी ओलीस धरले होते. कुठला आंतरराष्ट्रीय डॉन भारतात आला होता. तो कोणासाठी काम करत होता, हे उद्या उघड करणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.