Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले का स्वीकारले उपमुख्यमंत्रीपद

0

नागपूर,दि.५: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे देवेंद्र फडणवीसच. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने राज्यात भाजपाचे सरकार पुन्हा एकदा स्थापन केले. मात्र यावेळी मुख्यमंत्रीपद भाजपाकडे न घेता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेऊन अनेकांना धक्का दिला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. ते स्वतः या सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपा केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात येत असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाने केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यासाठीच त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त असूनही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. मंत्रीमंडळात जाणार नसल्याचं सांगूनही अर्ध्या तासात फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद कसं स्वीकारलं? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच त्याविषयी खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच, विमानतळावरून त्यांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली. तसेच, शिवरायांच्या गनिमी काव्यानं सरकार परत मिळवल्याचं देखील ते म्हणाले.

“मी म्हटलं होतं की हे सरकार बनवेन, पण मी सरकारमध्ये जाणार नाही. तशी घोषणाही केली होती. पण घोषणा करून घरी गेलो आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी जाहीर करून टाकलं की फडणवीसांनी सरकारमध्ये जावं. नड्डा, अमित शाह माझ्याशी बोलले. शेवटी मोदींशी संवाद केल्यानंतर पक्षात आदेश हाच महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन एकच निर्णय घेतला. नागपुरातला देवेंद्र फडणवीस जर भाजपा आणि मोदी नसते, तर कधीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. त्यामुळे जे नेते आणि पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात, त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे. त्यांनी तर माझा सन्मान करून मला सरकारमध्ये जाण्यास सांगितलं. म्हणून मी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“अडीच वर्षापूर्वी २०१९ला महाराष्ट्रात तुम्ही भाजपा-शिवसेनेचं सरकार आणलं. पण आपल्याशी बेइमानी झाली. आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला. आपलं बहुमत पळवलं गेलं. जनतेचा कौल चोरी गेला. पण तो चोरी गेलेला कौल अडीच वर्षाची लढाई लढून आम्ही परत मिळवलाय. तुमच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार नव्याने महाराष्ट्रात आपण आणलं आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरचं एकनाथ शिंदेंचं स्वागत ठाणे-मुंबईलाही ऐकू गेलं पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही

काही लोक म्हणतात, हे सरकार ६ महिने चालेल. २०१४चं सरकार आल्यानंतर तेव्हाही हेच म्हणायचे की वर्षभराच्या वर सरकार चालणार नाही. पण ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. २०२४मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here