devendra fadnavis: पोलीस चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांनी केला हा आरोप

0

मुंबई,दि.१३: devendra fadnavis: विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज दुपारी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर दोन तास चौकशी देखील करण्यात आली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) जे काही म्हणाले त्यात खूप फरक आहे. मला जे प्रश्नं पाठवले आणि आज जे प्रश्न विचारण्यात आले त्यात अंतर होतं. ऑफिशियल सीक्रेट एक्टचा मी उल्लंघन केलं अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. जेणेकरून मला आरोपी किंवा सहआरोपी बनवण्याचा प्रयत्न चौकशीतून झाला. मी जबाबदार नेत्याप्रमाणे वागलो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दोन तास चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन परखड शब्दांमध्ये टीका केली. पोलीस बदल्यातील घोटाळा बाहेर काढला म्हणून हे सुरू आहे. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याची कागदपत्रे त्यांनाच देता येत नाही. मी केंद्रीय गृह सचिवांना ही कागदपत्रे सोपावली. अतिसंवेदनशील कागदपत्रे मी कधीच समोर आणली नाही. मंत्री नवाब मलिक यांनी हा प्रकार समोर आणला. मग संवेदनशील कागदपत्रे मलिकांनी उघड केले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका

दरम्यान, संजय राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांच्या चौकशीआधी आज सकाळी खोचक ट्वीट करून “तुम्ही का घाबरताय?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून फडणवीसांनी टोला लगावला आहे. “मी त्यांनाच विचारतोय की मी तर मोकळेपणाने म्हटलं मी चौकशीसाठी तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेत राहतात. रोज केंद्रीय यंत्रणांवर आरोप करतात. मी स्वत:हून म्हटलं मी चौकशीला यायला तयार आहे. त्यांच्यात आहे का हिंमत हे बोलायची? ते रोज ‘मला का बोलावलं’ म्हणत राहतात”, असं फडणवीस म्हणाले.

“संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन घोषित केलं की प्रिव्हिलेज असूनही ते न वापरता चौकशीला जाणार आहे. पण माझा सवाल आहे की संजय राऊतांवर अशी परिस्थिती आल्यावर ते का घाबरतात. ते रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मला का बोलावता’ असं का विचारत राहतात?” असा सवाल देखील फडणवीसांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here