देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा केला गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.9: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला होता. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी संपूर्ण तपशीलासह मोठा गौप्यस्फोट केला.

‘१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार शाह वली खान आणि मोहम्म सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल यांचे नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध असून मलिक कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीनं त्यांच्याकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केली आहे,’ असा आरोप फडणवीस यांनी केला. मुंबईत कुर्ला भागातील एलबीएस रोडवर गोवावाला कम्पाउंड नावााची ही जमीन आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या ‘सॉलिडस कंपनी’नं २००७ साली जमिनीचे पावर ऑफ ॲटर्नी असलेल्या शाह वली खान व सलीम पटेल यांच्याकडून ही जमीन खरेदी केली. तीन एकर जमीन अवघ्या ३० लाखांत खरेदी केली गेली.

त्यातलेही फक्त २० लाख रुपये दिले गेले. त्यातील १५ लाख रुपये सलीम पटेलला व ५ लाख रुपये शाह वली खान याला मिळाले,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. याशिवाय, एलबीएस रोडवरच असलेल्या ‘फोनिक्स सिटी’च्या जमिनीचा व्यवहार २००५ साली २०५० रुपये चौरस फुटानं झाला होता. ही जमीन ‘सॉलिडस’नं शाह वली खान व सलीम पटेल याच्याकडून अवघ्या २५ रुपये चौरस फुटानं घेतलीय. त्याचं पेमेंट १५ रुपये चौरस फुटानं केलंय,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.

‘स्वत: नवाब मलिक हे काही वर्षापूर्वीपर्यंत ‘सॉलिडस’ कंपनीत संचालक होते. कालांतरानं त्यांनी राजीनामा दिला. मात्र, आजही त्यांचे कुटुंबीय या कंपनीत आहेत. राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्याची गरज का भासली? हे लोक गुन्हेगार आहेत हे त्यांना माहीत नव्हतं का? टाडाच्या आरोपींची जमीन नियमानुसार सरकारकडून जप्त केली जाते. ही जप्ती येऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता का?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच फडणवीस यांनी केली.

केवळ एकच नाही अशा पाच मालमत्तांची खरेदी सॉलिडस कंपनीकडून झाली आहे. यातील चार मालमत्तांचा थेट संबंध अंडरवर्ल्डशी आहे. एका प्रकरणाची कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत, असं फडणवीस म्हणाले. ‘जमीन खरेदीच्या या व्यवहारांचे सर्व पुरावे माझ्याकडं असून ती लवकरच योग्य यंत्रणेकडं सोपवणार आहे, असं फडणवीस म्हणाले. ही योग्य यंत्रणा मुंबई पोलीस आहेत, सीबाआय आहे, ईडी आहे की एनआयए याची माहिती लवकरच घेतली जाईल, असा सूचक इशाराही फडणवीस यांनी दिला. त्याचबरोबर, माझ्याकडं असलेल्या पुराव्यांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार आहे, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here